रानातली भाजी, आरोग्याची साजी!
निर्सग अभ्यासक फाउंडेशन'च्या मार्गदर्शनाखाली आयोजित विशेष सत्रातून आदिवासी खाद्यसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध भान आणि रानभाज्यांचे औषधी उपयोग उलगडले
भामरागड – शहरी जीवनशैलीत आरोग्य समस्यांचे वाढते प्रमाण पाहता, नैसर्गिक आणि पारंपरिक आहारपद्धतीकडे वळण्याची गरज अधिक ठळक झाली आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयात 'रानभाज्या खा, स्वस्थ रहा' या विषयावर एक अभ्यासपूर्ण सत्र नुकतेच संपन्न झाले. 'निर्सग अभ्यासक फाउंडेशन'चे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलास निखाडे यांच्या सखोल मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आदिवासी समाजातील रानभाज्यांच्या उपयोगाचा शास्त्रशुद्ध परिचय मिळाला.
या सत्रात प्रा. डॉ. निखाडे यांनी आदिवासी समाजाचे पारंपरिक अन्नसंस्कार, ऋतुनुसार बदलणाऱ्या रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे आहारमूल्य, तसेच आरोग्यावरील फायदे यांची मांडणी आकडेवारीसह केली. त्यांनी सांगितले की, भारतभरात १५३० हून अधिक वनस्पती खाद्य म्हणून वापरल्या जातात. त्यात ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या आणि १४५ कंद समाविष्ट आहेत. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील कोळी, गोंड, गोवारी, आणि ढिवर जमातींमध्ये सुमारे २५ रानभाज्या दररोजच्या जेवणाचा भाग आहेत.
उदाहरणादाखल, 'तांदुळजा', 'घोळ', 'कुरडू', 'कर्टोली', 'आघाडा' यांसारख्या रानभाज्यांचे औषधी उपयोग आणि आहारातील भूमिका स्पष्ट करण्यात आली. मधुमेह, पचनविकार, खोकला आदींसाठी विशिष्ट वनस्पती कशा उपयुक्त ठरतात, याचेही सविस्तर विवेचन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी केवळ व्याख्यान ऐकून समाधान न मानता काही रानभाज्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांचे नाव, उपयोग आणि ऋतुनुसार उपलब्धता याचे लघुनोंद तयार केल्या.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ पर्यावरणशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनशैलीचा आणि अन्नसंपत्तीचा आदरपूर्वक अभ्यास करून शाश्वत आरोग्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळाने आणि 'निर्सग अभ्यासक फाउंडेशन'च्या स्वयंसेवकांनी मोठी भूमिका बजावली. स्थानिक पातळीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा सखोल अभ्यास करण्याचा हा उपक्रम भविष्यात विद्यार्थ्यांमधील संशोधनाची बीजे पेरणारा ठरेल, असे मत महाविद्यालयीन प्राध्यापकांनी व्यक्त केले.
.jpeg)
0 comments:
Post a Comment