अभिजात मायबोली मराठी : लोकपरंपरेचा गाभा, जागतिक संवादाची भाषा
इतिहास, लोकसंस्कृती, अभिजातता आणि आधुनिकतेचा सर्जनशील संगम
लेखक : जीवनदास काकडे | चंद्रपूर
(साहित्य अभ्यासक)
आज, २७ फेब्रुवारी—मराठी भाषा गौरव दिन. सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांची कास धरून मराठी साहित्याला अनंतकालीन दिशा देणारे थोर साहित्यिक, कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मभूषण वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन. “वृद्धत्व म्हणजे दुसरे बालपण; पण त्या बालपणाला आई नसते,” असे हळवे शब्द देणाऱ्या कुसुमाग्रजांविषयी वि. स. खांडेकर म्हणतात— “कुसुमाग्रजांची भाषा केवळ काव्याची नाही, ती जीवनाची आहे.”
याच अनुषंगाने नुकतेच सातारा येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरचे महत्त्वाचे पाऊल ठरले. २१ फेब्रुवारीचा जागतिक मातृभाषा दिन, २७ मार्चचा जागतिक रंगभूमी दिन—या सर्व सांस्कृतिक संदर्भांच्या चौफेर चौकटीतून मराठीच्या वाटचालीकडे पाहण्याची ही योग्य वेळ आहे.
ज्येष्ठ समाजअभ्यासक, मानववंशशास्त्रज्ञ व लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका प्रा. डॉ. तारा भवाळकर म्हणतात, “भाषा, लोकपरंपरा आणि मनुष्य या जिवंत संस्था आहेत. भाषा जैविक आहे; तिचे स्वरूप बदलते, पण अस्तित्व टिकते.” मराठीची ताकद याच जिवंतपणात आहे. “पुष्पामाजी पुष्प मोगरी…” म्हणणारे फादर स्टीफन्स असोत, उत्तर भारतातील लल्लेश्वरी किंवा दक्षिणेतील अक्कमहादेवी—मराठीचा आत्मा सीमारेषांपलीकडेही उमटलेला दिसतो.
लोकपरंपरेतून घडलेली भाषा
महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संमिश्रतेतून मराठीचा विकास झाला. जात्यावरच्या ओव्या, अंगाई, पाळणे, लग्न-हळदीची गाणी, श्रमगीत, उखाणे—विशेषतः स्त्रियांच्या जगण्यातून आलेले भाव—यांनी मराठीला लोकजीवनाशी घट्ट जोडले. “जनी म्हणे जाते जाईन…” अशा ओव्यांतून भक्ती, वेदना आणि आत्मभान व्यक्त झाले.
वारकरी, महानुभाव, नाथ, समर्थ, शैव-शाक्त परंपरांनी मराठीला ज्ञानभाषा बनवले. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाने लोकभाषेला धर्मभाषेचा दर्जा दिला; संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकारामांनी मराठीला अभिजाततेची उंची दिली. “माझा मराठीची बोलू कौतुके…” हा आत्मविश्वास त्याच काळात रुजला.
आदिवासी व वंचित समाजांचे योगदानही तितकेच मूलभूत आहे. निसर्गाशी एकरूप असलेल्या त्यांच्या गीतांमध्ये ‘शुभ मंगल’चा अर्थ निसर्गदेवतांच्या आवाहनातून उमटतो. ही लोकसंस्कृती मराठीच्या मुळाशी आहे.
राजसत्ता, साहित्य आणि आधुनिक वाटचाल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठीला राजभाषेचा मान मिळाला. राज्यव्यवहारकोश आणि आज्ञापत्र यांसारख्या ग्रंथांनी मराठीला प्रशासकीय प्रतिष्ठा दिली. पुढे केशवसुतांपासून आधुनिक लेखकांपर्यंत, विश्वकोश, शब्दकोश, अनुवाद परंपरा आणि साहित्य संमेलने—या सर्वांनी मराठीला वैचारिक स्थैर्य दिले.
जागतिक व्यासपीठावर मराठी
मराठीचा प्रभाव महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. थंजावूरपासून गुरुग्रंथ साहिबातील संत नामदेवांच्या अभंगांपर्यंत, तसेच युरोप-अमेरिकेतील विद्यापीठांतील मराठी अभ्यासापर्यंत तिचा ठसा उमटलेला आहे. जागतिक मराठी संस्था, संमेलने आणि साहित्यिक चळवळी मराठीला विश्वसंवादाची भाषा बनवत आहेत.
आजचे युग आणि मराठी
जागतिकीकरणाच्या काळात अनेक भाषा अस्तित्वासाठी झुंज देत असताना मराठी नव्या माध्यमांतून अधिक सशक्त होत आहे—ब्लॉग, पॉडकास्ट, चित्रपट, वेब-सिरीज, अनुवाद. मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही; ती विचारांची दिशा, संस्कृतीची ओळख आणि अस्मितेचा आधार आहे.
स्वमत
अभिजात दर्जा हा प्रारंभ आहे; खरा कस व्यवहारातील वापरात आहे. शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान आणि लोकसाहित्य—या सर्व क्षेत्रांत मराठीचा आग्रह धरल्यास तिचे भविष्य उज्ज्वल राहील. कालिदासाच्या उक्तीप्रमाणे, जुने म्हणून सर्व चांगले नसते आणि नवे म्हणून सर्व दोषपूर्ण नसते—समतोल दृष्टीच आवश्यक आहे.
लोकभाषा, राजभाषा, ज्ञानभाषा, अभिजात भाषा—अशी बहुरंगी मराठी ही मन-मातीची माया, मूल्यांची मशाल आणि माणुसकीची भाषा आहे. आधुनिकतेच्या महासागरातही ही मशाल तेजस्वी राहो, हीच मराठीप्रेमींची मंगल कामना.
0 comments:
Post a Comment