निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचा आंबा बहरावर आधारित शास्त्रीय अभ्यास उपक्रम
भामरागड: येथे निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने आंब्याला येणाऱ्या बहराचा (मोहोराचा) सखोल अभ्यास उपक्रम राबविण्यात आला. या अभ्यासात आंब्याच्या फळधारणेसाठी निर्णायक ठरणाऱ्या मोहोर टप्प्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंब्याचा मोहोर हा साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत येतो आणि याच टप्प्यावर संपूर्ण हंगामाचे उत्पादन अवलंबून असते, हे या उपक्रमाचे केंद्रबिंदू होते. योग्य छाटणी, खत व्यवस्थापन, तसेच तुडतुडे व भुरीसारख्या किडी-रोगांवर नियंत्रणासाठी आवश्यक फवारणी (सप्तामृत) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीसह विविध कृषी संशोधन स्रोतांचा संदर्भ देत, बाहार व्यवस्थापन योग्य केल्यास मोहोरगळ थांबवता येते आणि दर्जेदार उत्पादन मिळते, हे उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आले.
डॉ. कैलास निखाडे यांनी हवामानाचा मोहोरावर होणारा परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितला. “यावर्षी हवामान स्थिर राहिले, तर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसेल आणि सर्वसामान्यांना भरपूर आंबा उपलब्ध होईल; मात्र अचानक हवामान बदल झाल्यास मोहोर गळून उत्पादनात मोठी घट येऊ शकते,” असा अभ्यासाधारित अंदाज त्यांनी मांडला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. संतोष डाखरे यांनीही यावर्षी आंब्याचा बहर समाधानकारक असून योग्य काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष झाडांवरील मोहोर पाहून प्रश्न विचारले, नोंदी केल्या आणि हवामान–उत्पादन यातील परस्परसंबंध समजून घेतला. अभ्यासपूर्ण नियोजन आणि प्रत्यक्ष क्षेत्रावर आधारित मांडणीमुळे हा उपक्रम केवळ माहितीपर न राहता उपयुक्त ठरला.
“आंब्याचा मोहोर समजून घेतला, तर अर्धे उत्पादन आपल्या हातात येते,” असे डॉ. कैलास निखाडे यांनी सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
अशा उपक्रमांमुळे कृषीशिक्षण, स्थानिक अनुभव आणि शास्त्रीय माहिती यांचा सुंदर संगम साधला जातो. भविष्यातही अशा अभ्यासपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आधुनिक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

.jpeg)


0 comments:
Post a Comment