रानभाज्यांच्या अभ्यासातून निसर्गाशी नाळ घट्ट करणारा महोत्सव संपन्न


भामरागडमध्ये ‘निसर्ग अभ्यासक फाउंडेशन’च्या पुढाकारातून रानभाज्या अभ्यास व संवर्धन महोत्सवाचे यशस्वी आयोजन

भामरागड येथे ‘निसर्ग अभ्यासक फाउंडेशन’च्या संकल्पनेतून आणि डॉ. कैलास व्ही. निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक आहारसंस्कृती व आदिवासी ज्ञानसंपदेच्या अभ्यासाला चालना देणारा रानभाज्या अभ्यास, जनजागृती व संवर्धन महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. राजे विश्वेश्वरराव कला व वाणिज्य महाविद्यालय व राजे धर्मराव विद्यालय (कनिष्ठ महाविद्यालय), भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शैक्षणिक उपक्रमाने विद्यार्थ्यांना स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करून दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संतोष डाखरे होते, तर उद्घाटन प्रा. डॉ. प्रमोद सं. घोनमोडे यांच्या हस्ते झाले. कु. एम. बी. गावडे, श्री. एस.एच. खंडारकर, श्री. एस.पी. गावडे, श्री. सि.यु. घोडे, श्री. डी.पी. चालुरकर व कु. एस.एच. झलके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती नोंदवली.

प्रास्ताविकामध्ये डॉ. निखाडे यांनी रानभाज्यांची व्याख्या करताना सांगितले की, निसर्गतः उगवणाऱ्या या वनस्पतींमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, आणि औषधी गुणधर्म आढळतात. त्या केवळ पारंपरिक अन्न म्हणून नव्हे तर आरोग्य रक्षणासाठीही उपयुक्त ठरतात. आदिवासी समाज आजही आपल्या आहारात या वनस्पतींचा प्रामुख्याने उपयोग करतो.

या कार्यक्रमात ‘निसर्ग अभ्यासक फाउंडेशन’चे "निसर्गाचा ध्यास, निसर्ग अभ्यास!" हे गीत डॉ. डाखरे यांच्या लेखणीतून साकारले गेले असून, या गीताचे विमोचन करण्यात आले. त्यांनी गीतामागचा आशय विद्यार्थ्यांना समजावून सांगताना निसर्गाशी आपले नाते कसे जपावे यावर भर दिला.

उद्घाटनपर भाषणात प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी भारतातील ४२७ आदिवासी जमातींपैकी महाराष्ट्रातील ४७ जमाती रानभाज्यांचा कसा वापर करतात, याची माहिती दिली. जगभरात वनस्पतींच्या सुमारे ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १५३० हून अधिक वनस्पती खाण्यासाठी वापरतात, ही माहिती विशेष लक्षवेधी ठरली.

श्री. शैलेश गावडे आणि श्री. एस.एच. खंडारकर यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी उपयोग व त्यांचे सामाजिक-आर्थिक महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. डाखरे यांनी या अभ्यासाचा कालावधी संपूर्ण जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत असणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये नव्या रानभाज्यांचा शोध, त्यांचे वर्गीकरण व संवर्धन यावर भर दिला जाणार आहे.

याच दरम्यान रानभाज्यांवरील निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना स्थानिक खाद्यसंस्कृतीची सखोल जाण प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन कु. अस्मिता डागला यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले, तर आभार प्रदर्शन श्री. घोडे सरांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील ताजणे, बंडू बोन्डे, विवेक येरगुडे, रमेश गांडगे या कार्यकर्त्यांनी समर्पित प्रयत्न केले. संपूर्ण उपक्रमाने शैक्षणिक दृष्टिकोनासोबतच पर्यावरणपूरक विचारांचा प्रसार केला आहे.





Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment