टेंभुरणी फळाचा अभ्यास : निसर्ग संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
निसर्ग अभ्यासक फाउंडेशनतर्फे अभ्यास सत्र संपन्न
भामरागड: निसर्ग संवर्धन आणि स्थानिक वनस्पतींच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने टेंभुरणी फळावर विशेष अभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संकल्पनेचे श्रेय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. कैलास व्हि. निखाडे यांना जाते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. संतोष डाखरे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विनायक मोराळे आणि प्रा. विशाल तावडे उपस्थित होते.
टेंभुरणी वृक्षाचे महत्त्व आणि अर्थकारण:
टेंभुरणी, संस्कृतमध्ये तिन्दुक आणि हिंदीमध्ये तेंदू म्हणून ओळखला जाणारा वृक्ष, औषधी आणि आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या झाडाची उंची साधारणतः २० ते २५ मीटर असते, आणि याचे फळ आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. याच्या पानांचा उपयोग विड्या वळण्यासाठी केला जातो, त्यामुळे तेंदूपत्ता संकलन हा अनेकांचा उपजीविकेचा स्रोत आहे. मात्र, अती संकलनामुळे आणि अवैज्ञानिक पद्धतीमुळे या झाडांची संख्या कमी होत आहे.
कार्यक्रमात डॉ. कैलास निखाडे यांनी झाडाची वाढ, त्याचे आर्थिक फायदे आणि संवर्धनाची गरज याबाबत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की “टेंभुरणीच्या फळाची बाजारपेठ तयार झाल्यास स्थानिकांना चांगला रोजगार मिळू शकतो.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी या वनस्पतीच्या संवर्धनावर भर दिला, तर उद्घाटक प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी या झाडाची लागवड वाढवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. पुष्पा होयामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मनोज वाचामी यांनी केले. संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बंडू बोंडे आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
0 comments:
Post a Comment