राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत, विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित
भामरागड: राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि ग्रंथप्रदर्शनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी जीवन समजावून देण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सरस्वती माते आणि विश्वेश्वरराव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चालुरकर सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद घोनमोडे, डॉ. संतोष डाखरे, डॉ. कैलास व्हि. निखाडे आणि डॉ. सुरेश डोहणे उपस्थित होते.
ग्रंथपाल प्रा. विनायक मोराळे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना वाचनातून आपले ज्ञान कसे वाढवावे याचे मार्गदर्शन केले. अध्यक्ष प्रा. चालुरकर यांनी वाचन हे स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असे सांगितले, तर डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी शिक्षणाच्या व्यापक दृष्टिकोनाबद्दल चर्चा केली.
प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी स्वप्नांचे महत्त्व समजावताना सांगितले की, "स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत." यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयांच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला. डॉ. संतोष डाखरे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ. सुरेश डोहणे यांनी वाचनाची महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कशी असावी यावर जोर दिला.
या कार्यक्रमात बी. ए. च्या विद्यार्थिनी पुष्पा होयामी आणि ममता भांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साक्षी भांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागेश आलाम यांनी केले.
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषतः श्री. बंडू बोन्डे यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 comments:
Post a Comment