राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमाचे आयोजन

 

गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना समुपदेशन

    अहेरी: राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे १७ सप्टेंबर २०२४ रोजी गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञांच्या टीमने ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ताणतणाव व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाय करता येतील यावर सविस्तर चर्चा झाली.

    वैद्यकीय अधीक्षक वैभव चांडोळे, मानसशास्त्रज्ञ केशव होळम्बे आणि अजय खैरकर, तसेच परिचारिका किरण सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मानसिक आजारांची लक्षणे ओळखणे आणि त्यासाठी उपलब्ध उपचार सुविधा याबद्दल माहिती दिली. सर्व उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना "मानसिक आजार व त्यांची लक्षणे" यासंदर्भात माहितीपत्रके वितरित करण्यात आली.    

    कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. मंडल यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन IQAC विभागाच्या वतीने करण्यात आले होते, ज्यामध्ये बी.एस्सी. I, II आणि III वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तणाव वाढल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14416 वर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश हलामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अतुल खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनंदा पाल, प्रा. श्यामल बिस्वास, प्रा. अनिकेत गोंडे, प्रा. कुणाल वनकर, डॉ. अरविंद राठोड, प्रा. कांचन धुर्वे, प्रा. आदेश मंचलवार आणि प्रा. व्यंकटेश इप्पला यांनी विशेष योगदान दिले.








Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment