राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’वर राज्यस्तरीय कार्यशाळा


अहेरीत शिक्षक-विद्यार्थ्यांच्या सहभागातून नव्या शैक्षणिक सुधारणांवर सखोल चर्चा

अहेरी (दि. ८ सप्टेंबर) : राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथे "प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA)" अंतर्गत अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स या महत्त्वपूर्ण संकल्पनेवर राज्यस्तरीय क्षमतावर्धन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच झाले. प्रत्यक्ष व ऑनलाईन अशा दुहेरी पद्धतीत आयोजित या कार्यशाळेत सुमारे २०० प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.

या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. श्यामराव बुटे, प्राचार्य, भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक सुधारणा ही केवळ धोरणात्मक बाब नसून, भविष्याभिमुख संस्था घडविण्याचे साधन असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रमेश हालामी यांनी महाविद्यालयीन स्तरावर अशा कार्यशाळांची सातत्याने आवश्यकता असल्यावर भर दिला.

कार्यशाळेच्या शैक्षणिक सत्रांमध्ये प्राचार्य डॉ. मृणाल काले व डॉ. प्रशांत वाघ या आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील विषयतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या क्रेडिट संकलनाची रचना (ABC), फील्ड प्रोजेक्ट (FP), तसेच कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम (CEP) याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. चर्चेनंतरचे मनोगत डॉ. राजेशकुमार सूर यांनी व्यक्त केले, तर उपस्थित मान्यवर प्राध्यापकांमध्ये डॉ. घोडेस्वर, डॉ. काटकर, डॉ. सोनवणे, डॉ. ढबाले, डॉ. मेश्राम आदींचा सहभाग लक्षणीय ठरला.

कार्यशाळेच्या नियोजन व समन्वयात डॉ. प्रशांत ठाकरे, समन्वयक, PM-USHA, गोंडवाना विद्यापीठ यांचा सक्रिय पाठिंबा महत्त्वाचा ठरला. स्थानिक पातळीवर प्रा. अनिकेत गोंडे यांनी प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांना आदेश मंचलवार, प्रा. तानाजी मोरे, प्रा. अतुल खोब्रागडे, डॉ. श्यामल बिस्वास, डॉ. सुनंदा पाल, डॉ. अरविंद राठोड, प्रा. कांचन धुर्वे, श्री. अरुण घाटे, श्री. दुलाल बच्छर, श्री. शशिकांत गावंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेवटी प्रा. कुणाल वनकर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व भोजनानंतर सहभागींच्या अनौपचारिक चर्चांनी वातावरण रंगतदार झाले. या उपक्रमातून नवीन शैक्षणिक सुधारणा आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कार्यशाळेतून व्यक्त करण्यात आले.









Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment